नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने ५० हजारांची फसवणूक; आरोपीस अटक.

बँकेतून पैसे काढून घरी जात असताना हातचलाखीने लंपास केली रक्कम; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई.

सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : दिवाळी सणानिमित्त बँकांमध्ये आर्थिक व्यवहारांसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना, याचाच फायदा घेत नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने एका नागरिकाची ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सोमेश्वरनगर येथील बँक ऑफ बडोदा शाखेतून दिवाळीच्या खरेदीसाठी ५५ हजार रुपये काढून घरी जात होते. बँकेत पैसे मोजत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बसली होती.
त्यानंतर फिर्यादी दुचाकीवरून घरी जात असताना संबंधित व्यक्ती काळ्या रंगाच्या मोपेडवरून त्यांच्या जवळ आली. तुमच्या खिशातील नोटा खराब आहेत, त्या बदलून तुम्हाला चांगल्या नोटा देतो, असे सांगून त्याने फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ५० हजार रुपयांची रक्कम हातात घेऊन नोटा बदलून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी केली आणि पैसे घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी अहोरात्र तपास करून सरफराज मानू इराणी (वय ५०, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यास अटक केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सादिक इनामदार करीत आहेत. तपासकामी पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार नितीन तांबे, किरण शेलार, पोलीस शिपाई नरेंद्र यादव, आबा जाधव, निलेश जाधव, सचिन घाडगे, सूरज धोत्रे व विकास येटाळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
दरम्यान, सणासुदीच्या काळात अनोळखी व्यक्तींकडून पैसे बदलून देणे, नोटा तपासून देणे किंवा अन्य कोणत्याही बहाण्याने आर्थिक व्यवहार करण्यास सांगितल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.