अध्यक्षपदावर राजवर्धन शिंदे यांची हॅट्ट्रिक; संग्राम सोरटे यांना दुसऱ्या टर्ममध्ये उपाध्यक्षपदाची संधी
अनुभवी नेतृत्व आणि युवा चेहऱ्याचा संगम; सुनेत्रा पवार यांचा जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न
सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी गुरुवारी (दि. ५) पार पडल्या. कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची निवड झाली. शिंदे यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने त्यांनी अध्यक्षपदाची हॅट्ट्रिक साधली आहे. तर दुसऱ्या टर्ममध्ये संचालक मंडळात आलेल्या संग्राम सोरटे यांना उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे.
सोमेश्वर कारखान्याची यंदाची पंचवार्षिक निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. एकीकडे उच्चांकी ऊसदरामुळे कारखाना चर्चेत असतानाच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचे निशाण फडकावल्याने निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांनीही यासाठी विशेष मेहनत घेतली.
संचालक मंडळाची निवड झाल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत कार्यक्षेत्रात उत्सुकता होती. सोमेश्वर हा राज्यातील उच्चांकी ऊसदर देणारा कारखाना असल्याने दोन्ही पदांवर अनुभवी आणि सक्षम नेतृत्वाला संधी मिळावी, अशी सभासदांची अपेक्षा होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व बाजूंनी विचार करून जातीय समतोल साधत राजवर्धन शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद, तर संग्राम सोरटे यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
शिंदे यांचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव
राजवर्धन शिंदे यांच्याकडे यापूर्वी दोन वेळा अध्यक्षपदाची जबाबदारी होती. २००२ ते २००६ आणि २०१० ते २०१३ या कालावधीत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०१४ पासून पुरुषोत्तम जगताप यांनी सलग १३ वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता पुन्हा एकदा शिंदे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आल्याने त्यांची ही तिसरी टर्म ठरली आहे. सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि कारखान्याच्या कामकाजाची असलेली जाण लक्षात घेता त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
संग्राम सोरटे यांना उपाध्यक्षपदाची संधी
संग्राम सोरटे हे गेली पाच वर्षे कारखान्याच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. नवनाथ उद्योग समूह आणि त्याअंतर्गत विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी बारामती तालुक्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच बारामती तालुका दूध संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. या अनुभवाच्या जोरावर आता त्यांच्याकडे कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राजवर्धन शिंदे आणि संग्राम सोरटे या दोघांनीही अजितदादा पवार, त्यांचे कुटुंबीय आणि पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. राजकीयदृष्ट्या कठीण परिस्थितीतही पक्षनिष्ठेला प्राधान्य देत त्यांनी आव्हाने स्वीकारली. त्याचीच दखल घेत कारखान्याच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी या दोघांकडे सोपविण्यात आल्याची चर्चा आहे.
उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम राखण्याचे आव्हान
सोमेश्वर कारखान्याची उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम राखणे, सभासदांच्या हिताचे निर्णय घेणे, कारखान्याची आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साधणे, तसेच शिक्षण संस्थांकडे विशेष लक्ष देऊन त्यांचा विस्तार व गुणवत्ता वाढविणे, अशी अनेक आव्हाने नवनिर्वाचित अध्यक्ष राजवर्धन शिंदे आणि उपाध्यक्ष संग्राम सोरटे यांच्यासमोर असणार आहेत. अनुभवी नेतृत्व आणि युवा कार्यक्षमतेचा संगम कारखान्याच्या आगामी वाटचालीला कितपत गती देणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment