Crime News सुपारी देऊन खुनाचा कट रचल्याचा आरोप; चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सरपंच जेरबंद!
मेडदच्या विद्यमान सरपंचाला माळेगाव पोलिसांकडून अटक; खुनाचा प्रयत्न, खंडणीसह यापूर्वी १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती
सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील मेडद येथील अल्पवयीन मुलाच्या खुनाचा कट रचल्याच्या आरोपावरून गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मेडद ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गणेश दत्तात्रय काशीद याला अखेर माळेगाव पोलिसांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी तीन वाजता अटक केली. संबंधित अल्पवयीन मुलाच्या खुनासाठी पाच लाख रुपये आणि दोन गावठी पिस्तुले दिल्याचा आरोप तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.गावठी पिस्तूल आणि काडतुसाच्या प्रकरणातून तपासाला दिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास माळेगाव खुर्द हद्दीतील माळेगाव ते कऱ्हावागज रस्त्यावरील तुकाई चौक परिसरात एका बंद पत्र्याच्या शेडसमोर पोलिसांनी कारवाई केली होती. या वेळी गणेश तात्याराम गावडे (वय २०, रा. कऱ्हावागज) याच्याकडे एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि कुकरी चाकू बेकायदेशीररीत्या आढळून आले. या कारवाईत मयूर विष्णू मोरे (रा. मेडद) याचाही उल्लेख असून, संबंधित चारचाकी वाहनासह आरोपींविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान गणेश गावडे आणि मयूर मोरे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यातून मेडद येथील अभिजित अर्जुन यादव या अल्पवयीन मुलाच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. आठ लाखांच्या व्यवहारातून पाच लाख रुपये दिल्याचा आरोप तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दत्तात्रय काशीद आणि सुजित निलेश नाळे (रा. कऱ्हावागज) यांच्यात अभिजित यादव याला जिवे मारण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप आहे. या कटासाठी गणेश गावडे याच्या जमिनीच्या विक्रीतून आठ लाख रुपयांचा धनादेश मयूर मोरे याला ४ जून २०२६ रोजी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हा धनादेश बारामती येथील पीडीसीसी बँकेच्या कसबा शाखेत जमा करून आठ लाख रुपये रोख काढण्यात आले. त्यापैकी तीन लाख रुपये गणेश काशीद याच्या घरी देण्यात आले, तर उर्वरित पाच लाख रुपये खंडोबानगर, बारामती येथील पेट्रोल पंपाजवळ सुजित नाळे याला दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर गणेश काशीद याने सुजित नाळे याला दोन गावठी पिस्तुले दिली आणि अभिजित यादव याला जिवंत सोडायचे नाही, अशा आशयाचे निर्देश दिल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित मुलांच्या वयाची खात्री करण्यास सांगितल्याचाही आरोप आहे.
राजकीय वैमनस्यातून कट रचल्याचा संशय
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश दत्तात्रय काशीद आणि अभिजित यादव यांचे कुटुंबीय यांच्यात राजकीय वैमनस्य असल्याची बाब तपासात समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेश काशीद आणि सुजित नाळे यांनी खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात दोघांचा सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने १२ जून २०२६ रोजी दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६१(२), १०३ आणि ५५ यांसह संबंधित कलमे वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चार महिन्यांपासून अटकेला हुलकावणी
आपल्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर गणेश काशीद याने पलायन केले होते. त्यानंतर तो वारंवार पोलिसांना गुंगारा देत अटक टाळत होता. अखेर माळेगाव पोलिसांनी त्याला २३ ऑक्टोबर रोजी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या गणेश काशीद याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि खंडणी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे एकूण १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याची पोलीस कोठडी घेऊन या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
माळेगाव पोलिसांची कारवाई
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे तसेच पोलीस अंमलदार अमोल वाघमारे, ज्ञानेश्वर मोरे आणि श्रीकांत माने यांनी ही कारवाई केली.
Comments
Post a Comment