निरा-बारामती रस्त्यावर उसाने भरलेली बैलगाडी नादुरुस्त; अपघाताचा धोका!सोरटेवाडी हद्दीत स्त्यावरच टायर; रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.


निरा-बारामती रस्त्यावर उसाने भरलेली बैलगाडी नादुरुस्त; अपघाताचा धोका!

सोरटेवाडी हद्दीत  स्त्यावरच टायर; रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.
सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे) : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६ चा ऊस गाळप हंगाम नुकताच सुरू झाला असून, निरा-बारामती रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांची वर्दळ वाढू लागली आहे. दरम्यान, सोरटेवाडी हद्दीत (कुलकर्णी चारी जवळ)निरा-बारामती रस्त्यावर टायर निकामी झाल्याने उसाने भरलेली एक बैलगाडी नादुरुस्त अवस्थेत रस्त्यावरच उभी आहे. बैलगाडीचा निकामी झालेला टायरही शेजारीच रस्त्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर बैलगाडी उसाने भरलेली असून, तिचा मालक घटनास्थळी उपस्थित नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, बैलगाडीवर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना ती सहज दिसावी यासाठी रिफ्लेक्टर किंवा अन्य कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. अंधारात किंवा समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशामुळे चालकांचे लक्ष विचलित झाल्यास नादुरुस्त बैलगाडी व रस्त्यावर ठेवलेला टायर नजरेस न पडण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने या रस्त्यावर ऊस वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभी असलेली बैलगाडी इतर वाहनांसाठी अडथळा ठरू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना या बैलगाडीचा अंदाज न आल्यास गंभीर अपघात घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कारखाना प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे!
सोरटेवाडी हद्दीतील(कुलकर्णी चारी शेजारी) या प्रकाराकडे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नादुरुस्त बैलगाडी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात. तसेच ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बैलगाड्यांवर रिफ्लेक्टर, रात्री दिसणारे सुरक्षा दिवे आणि आवश्यक सुरक्षा साधने आहेत की नाहीत, याची तपासणी करावी, अशी अपेक्षा वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका वेळीच दूर करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.