कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुलींचे वर्चस्व!पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद; अहिल्यानगर जिल्हा उपविजेता
कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या मुलींचे वर्चस्व!
पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद; अहिल्यानगर जिल्हा उपविजेता
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी (विनोद गोलांडे)
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत पुणे शहर, पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिक या चार विभागांतील एकूण ६३ मुलींनी दहा वजन गटांमध्ये सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर अहिल्यानगर जिल्ह्याला उपविजेतेपद मिळाले.
महाविद्यालयातर्फे प्रत्येक वजन गटातील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक आणि रौप्यपदक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वसाधारण विजेत्या व उपविजेत्या संघांना विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. डॉ. वायदंडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी महिला कुस्तीपटूंचे कौतुक करताना सांगितले की, “एक काळ असा होता की कुस्ती हा खेळ केवळ पुरुषांची मक्तेदारी मानला जायचा; मात्र आज मुलींना कुस्तीच्या आखाड्यात आत्मविश्वासाने लढताना पाहून छाती अभिमानाने फुलून येते. भारतीय महिला कुस्तीपटूंनी ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा उंचावला आहे.”
ते पुढे म्हणाले, “मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या मॅटवर लढणाऱ्या या रणरागिणींमधून उद्याची साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि अंतिम पंघाल यांच्यासारख्या यशस्वी कुस्तीपटू घडतील, असा मला विश्वास आहे. कुस्तीतील संघर्ष तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक संकटाशी लढण्याची ताकद देईल. या स्पर्धेतून निवडला जाणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत जास्तीत जास्त पदके मिळवून विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करा,” अशा शुभेच्छा देत त्यांनी खेळाडूंना उत्कृष्ट खेळ आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यापीठाचे अधिकारी किशोर गडियार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. राहुल गोलांदे, श्री. दत्ता उतेकर, डॉ. सुहास भैरट, सहसचिव डॉ. शीतल शेंडकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या डॉ. मनीषा पुंडे, अहिल्यानगर विभागाचे सचिव डॉ. राजेंद्र देवकाते आणि डॉ. संतोष भुजबळ उपस्थित होते.
या स्पर्धा आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही तक्रार उद्भवू न देता पारदर्शकपणे आणि यशस्वीरीत्या पार पाडल्या.
संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे-देशमुख यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयीन नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर कारखान्याचे संचालक श्री. अभिजीत काकडे-देशमुख यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांना स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी स्पर्धेच्या तयारीची पाहणी करून आयोजन यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. दत्तराज जगताप, एनसीसी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. संजू जाधव, डॉ. निलेश आढाव आणि मंगेश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment