करंजे गाव प्रवेशद्वारावर लोकनेते अजितदादा पवार यांचे नाव
‘I LOVE करंजे’ डिजिटल बोर्ड व आकर्षक विद्युत रोषणाई; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते लोकार्पण.
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे गावाच्या प्रवेशद्वाराला आधुनिक आणि आकर्षक स्वरूप देण्यात आले असून, प्रवेशद्वारावर ‘करंजे’ नामकरणासह ‘I LOVE करंजे’ असा डिजिटल आकर्षक बोर्ड उभारण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेले हे प्रवेशद्वार ग्रामस्थांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
लोकनियुक्त सरपंच भाऊसो हुंबरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे करंजे गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. शेखर भाऊ भगत यांनी आपले चुलते अरविंद भगत व रामभाऊ भगत यांच्या स्मरणार्थ ‘I LOVE करंजे’ हा डिजिटल आकर्षक बोर्ड गावासाठी उपलब्ध करून दिला आहे.
या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान, आकर्षक लाइटिंग आणि बारामती तालुक्यात अठरापगड जाती धर्माची ओळख असलेल्या गावाच्या नावाची भव्य ओळख यामुळे करंजे गावाच्या प्रवेशद्वाराला लोकनेते अजितदादा पवार यांचे नाव दिल्याने प्रवेशद्वार अधिकचा आकर्षक झाला आहे.
प्रवेशद्वारावर दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचे नाव व छायाचित्र लावण्यात आल्याने त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. गावात प्रवेश करताना ‘I LOVE करंजे’ डिजिटल बोर्ड आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
करंजे गावाची स्वतंत्र आणि आकर्षक ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वारामुळे गावाच्या विकासाबरोबरच सौंदर्यातही भर पडली आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत असून, गावाच्या प्रवेशद्वाराला मिळालेला हा नवा लूक परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
Comments
Post a Comment