सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक....कोऱ्हाळे खुर्दमध्ये अजितदादा गटाच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

पक्षनिष्ठा आणि स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा; विद्यमान संचालिका प्रणिता खोमणे भावूक

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी (विनोद गोलांडे)

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गटांकडून गावभेटी आणि सभांचा धडाका सुरू असताना चार नंबर गटातील कोऱ्हाळे खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाच्या वतीने सभासद व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी विद्यमान संचालिका तथा माजी व्हाईस चेअरमन प्रणिता मनोज खोमणे यांनी पक्षनिष्ठा आणि स्वर्गीय अजितदादांशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला. अजितदादांनी सोमेश्वर कारखान्यात संचालक तसेच व्हाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करून सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान काही सभासदांनी प्रणिता खोमणे यांच्या कामाचा उल्लेख करत त्यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा व्यक्त केला. सभासद व ग्रामस्थांचा मिळालेला प्रतिसाद पाहून प्रणिता खोमणे भावूक झाल्या. उपस्थितांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.

“आपली साथ, खंबीर पाठिंबा आणि आशीर्वाद कायम राहिला, तर आगामी काळातही सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार,” असे प्रणिता खोमणे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित सभासदांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा देत आपला पाठिंबा व्यक्त केला. तसेच स्वर्गीय अजितदादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर विश्वास कायम ठेवणार असल्याचे काही सभासदांनी सांगितले आणि " एकच वादा वहिनी आणि दादा " अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, चार नंबर गटातील या बैठकीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील प्रचाराला वेग आला असून, या गटातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.