शेतकरी अस्मानी संकटात; चोरट्यांकडून सुलतानी घाला!निंबूतमधील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरी; शेतीच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
शेतकरी अस्मानी संकटात; चोरट्यांकडून सुलतानी घाला!
निंबूतमधील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरी; शेतीच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
निंबूत-सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
अस्मानी संकटांमुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता विद्युत केबल चोरीच्या घटनांनी भर पडली आहे. निंबूत परिसरातील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतीला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निंबूत परिसरात गेल्या काही वर्षांपासून विद्युत मोटार पंप तसेच केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. चोरी झाल्यानंतर नवीन केबल व विद्युत साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आधीच शेतीमालाला मिळणारे दर, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर चोरीच्या घटनांमुळे नवे संकट उभे ठाकले आहे.
यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तसेच करंजेपूल पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी विद्युत पंप व केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यावेळी काही चोरीच्या घटनांचा तपास करून संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली होती. काही गुन्हे उघडकीस आल्याने संबंधित शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला होता.
मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा अशा चोरीच्या घटना वाढत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरीच्या प्रकरणांचा सखोल तपास करावा, यापूर्वीच्या प्रकरणांतील तपासाची माहिती घेऊन चोरट्यांचा माग काढावा, तसेच चोरीला गेलेले विद्युत साहित्य शोधून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतीचा वीजपुरवठा आणि सिंचन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विद्युत पंप, केबल व इतर विद्युत साहित्याच्या चोरीला आळा घालणे गरजेचे आहे. परिसरात रात्रीची गस्त वाढवून अशा घटनांवर नियंत्रण आणावे, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment