हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
बारामती प्रतिनिधी
देशभक्तीच्या जल्लोषात हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थित प्रत्येकाच्या मनात स्वातंत्र्याप्रति अभिमानाची आणि राष्ट्र प्रेमाची ज्योत प्रज्वलित केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे, माजी सैनिक मा. श्री. नंदकुमार दत्तात्रेय पिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री. पी. बी. कुलकर्णी सर तसेच मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी एकसुरात राष्ट्रगीताचे गायन केले. यानंतर शिक्षकांनी झेंडा गीत आणि राज्यगीताचे गायन करून वातावरणात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा निर्माण केली. यानंतर शाळेतील शिक्षिका सौ. भारती पोळ यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या परेडने उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध संचलनातून विद्यार्थ्यांनी एकजूट, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठेचे सुंदर दर्शन घडविले. त्यानंतर मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा रोप व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यानंतर पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या वेशभूषेत आकर्षक परेड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता १ ली व २ री च्या विद्यार्थ्यांनीही उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने भारताच्या विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोशाखात मैदानावर संचलन करत विविधतेत एकतेचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या पावलांतील आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाने उपस्थितांना विशेष आनंद दिला.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता ३ री व ४ थीच्या चिमुकल्या मुलींनी सादर केलेल्या योगा डान्सने कार्यक्रमात एक वेगळेच सौंदर्य, लय आणि उत्साह निर्माण केला. योगातील शिस्त, नृत्याची मोहकता आणि संगीताची तालबद्धता यांचा सुरेख संगम असलेल्या या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. त्यानंतर इयत्ता ५ वी व ६ वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर नृत्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. जोश, उत्साह आणि राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या सादरीकरणातून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना प्रभावीपणे व्यक्त झाली आणि संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले.
कार्यक्रमात पुढे इयत्ता ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी ‘हम करें राष्ट्र आराधन’, तर इयत्ता ५वी, ६ वी व ७वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जयोस्तुते श्री महन् मंगले’ या देशभक्तिपर गीतांचे जोशपूर्ण, सुरेल आणि तालबद्ध गायन सादर करून वातावरणात राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली. विद्यार्थ्यांच्या मधुर स्वरांतून उमटलेला देशप्रेमाचा भाव उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला आणि संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’ च्या भावनेने भारावून गेला.
यानंतर विविध बाह्य परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. गुणवंत आणि विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली.
यानंतर उपस्थितांना संबोधित करताना स्थानिक समितीचे सल्लागार माननीय श्री. पी. बी. कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
आपल्या मनोगतात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्याचे महत्त्व आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. त्या म्हणाल्या, “आपण मिळवलेल्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगलाच पाहिजे, कारण हे स्वातंत्र्य असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागातून आणि समर्पणातून मिळाले आहे. मात्र, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला, तर जीवनाचे उद्दिष्ट साध्य करणे अवघड होते. आपल्या वर्तनाला, आचाराला आणि विचारांना नैतिक मूल्ये, जबाबदारी, शिस्त आणि स्वनियंत्रणाची चौकट असणे आवश्यक आहे. भारतीय तरुणाईचे वर्णन जगाने संवेदनशील आणि त्याचबरोबर कर्तव्यनिष्ठ म्हणून करावे, यासाठी पालकांसोबत शिक्षकांचीही मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना योग्य संस्कारांनी घडवूनच आपण स्वातंत्र्यसैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून पाहिलेले विकसित, समृद्ध आणि शांतताप्रिय भारताचे स्वप्न साकार करू शकतो. माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे यश संपादन करून भारताचे नाव अधिकाधिक उज्ज्वल करावे आणि स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदारीचे भान सदैव जपावे, हीच माझी मनापासून इच्छा आहे.”
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माजी सैनिक श्री. नंदकुमार दत्तात्रेय पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आणि सैनिकांच्या त्यागाचा यथोचित आढावा घेत कारगिल युद्धाच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले, “भारताचे स्वातंत्र्य आज अबाधित आहे, ते सीमेवर सदैव तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्यामुळे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करणाऱ्या सैनिकांचे योगदान आपण सदैव स्मरणात ठेवले पाहिजे. त्यांच्या त्यागाची आणि देशसेवेची जाणीव प्रत्येक भारतीयाने मनात जपली पाहिजे.”
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. राधिका कोठाडिया आणि सौ. पुनम कोठावळे यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप करताना सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. अशा पद्धतीने पार पडलेला ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा ‘स्वातंत्र्य हे केवळ अधिकार नसून, राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव आहे,’ हा संदेश देत आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
तसेच शाला समितीचे अध्यक्ष मा.श्री. अजय पुरोहित सर यांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळात वेळ काढत शाळेला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास शाला समितीचे अध्यक्ष श्री.अजय पुरोहित सर, महामात्र मा.डॉ.श्री. गोविंद कुलकर्णी सर मएसो नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री.राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा.श्री.पी.बी. कुलकर्णी सर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment