अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना.
अनुदानासह ४,०००/- रुपये प्र.मे.टन एवढा सर्वोच्च अंतिम ऊसदर जाहिर करणारा सोमेश्वर ठरला राज्यातील पहिला कारखाना.
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२५-२०२६ गाळप हंगामाकरीता राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानासह प्रति मे.टन रु.४,०००/- असा ऐतिहासीक उच्चांकी ऊसदर जाहिर करणारा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना ठरला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
कारखान्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,८००/-, फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.३,९००/- व मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.४,०००/- एवढा सर्वोच्च असा ऐतिहासीक ऊसदर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जाहिर केल्याची माहिती श्री. जगताप यांनी दिली. संपुर्ण राज्यात एफ.आर.पी. पेक्षा प्र.मे.टन रु.५१५/- जास्त ऊसदर देणारा श्री सोमेश्वर कारखाना राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे.
श्री. जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, मागील गाळप हंगाम २०२५-२०२६ मध्ये कारखान्याने एकूण १२,९८,५५९.३५७ मे. टनाचे गाळप केले असून बी हेवीसह सरासरी १२.२७ टक्के साखर उतारा राखीत १५,५७,६५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत 'कारखान्याच्या को-जन प्रकल्पामधून १२,५३,४४,६८० युनिट्सची वीजनिर्मिती केली असून ८,३६,७०,४८० युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून ८६,२५,००१ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून सोबत ४३,८२,५६९ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. आपल्या सोमेश्वर कारखान्याची सन २०२५-२६ हंगामाची रु.३,२८५/- प्र.मे.टन इतकी एफ.आर.पी. होती त्यावर कारखान्याने आजअखेर रु.३,३००/- प्रति मे. टनाप्रमाणे रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली होती. उर्वरीत रक्कम ही दिवाळीपुर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडाळाच्या बैठकीमध्ये घेणेत आलेला आहे.
येणाऱ्या गळीत हंगाम २०२६-२७ मध्ये माहे फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास रु.१००/-, मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसास रु.२००/- तर एप्रिल व त्यानंतर तुटणाऱ्या ऊसास रु.३००/- प्र.मे.टन अनुदान देणेत येणार आहे. तसेच येणाऱ्या हंगामामध्ये हार्वेस्टरद्वारे तुटणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रु.५०/- प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देणेत येणार असून, १५ फेब्रुवारीनंतर तुटुन राखलेला खोडवा जो गाळपास येणार आहे त्यास प्र.मे.टन रु.१००/- प्रमाणे अनुदान देणार असल्याचे श्री. जगताप यांनी सांगितले.
लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी काटकसरीने, शिस्तीने व ध्येयधोरणानुसार कारखाना चालविणेसाठी जे अनमोल मार्गदर्शन यापुर्वी कायम केले होते त्याच धर्तीवर राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री व कारखान्याच्या मार्गदर्शिका आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांचेदेखिल काटकसरीने व शिस्तप्रिय ध्येयधोरणानुसार कामकाज करण्याचे मार्गदर्शन नेहमीच संचालक मंडळाला लाभत आलेले आहें. त्याचप्रमाणे संचालक मंडळाचे देखिल या बहुमोल मार्गदर्शनास अनुसरुन सुरु असलेले काटकसरीय व उत्तम नियोजनपुर्व कारभार यामुळे आपला सोमेश्वर सर्वोच्च ऊसदराची परंपरा गेली अनेक वर्ष निर्विवाद कायम राखू शकला याचा आम्हा संचालक मंडळास अभिमान आहे. कारखान्याच्या सर्वोच्च ऊसदर देण्याच्या पंरपरेसोबतच संचालक मंडळाने कारखान्याची विस्तारवाढ, को-जनरेशनची विस्तारवाढ पुर्ण केलेली असून गाळप हंगाम २०२६-२७हंगामाबरोबर डिस्टीलरी सुरु करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
कारखान्याचे सभासद, अधिकारी, कामगार, ऊस तोडणी वाहतूकदार कामगार यांच्या सहकार्यामुळेच सोमेश्वरची घौडदौड यशस्वीरित्या सुरु असून यापुढील काळातही आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल असा विश्वास श्री. जगताप यांनी व्यक्त केला. श्री. जगताप पुढे म्हणाले की, गेल्या पाच हंगामात आपण सरासरी प्र.मे.टन रु.३,४००/- चे आसपास विक्रमी ऊसदर देत असून यापुढील काळातही सर्वोच्च ऊस दर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहील.
श्री. जगताप पुढे म्हणाले की, येणाऱ्या गाळप हंगाम २०२६-२७ करीता कारखाना कार्यक्षेत्रात एकूण ३९००० एकर ऊसाची नोंद कारखान्याकडे आलेली असून यामधून अंदाजे १२ ते १२.५० लाख मे. टन ऊस गाळपास उपलब्ध होण्याचा शेतकी विभागाचा अंदाज आहे. आपला सोमेश्वर कारखाना संपुर्ण राज्यात सर्वार्थाने नावलौकीक मिळविलेला कारखाना असून यापुढील काळात सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम राखण्यासाठी सर्व सभासद शेतकऱ्यांनी यापुढील काळातही आपल्या सोमेश्वर कारखान्यासच ऊस घालावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
Comments
Post a Comment